U19 World Cup 2024 Semi-Final 2 Match AUS vs PAK : आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (11 फेब्रुवारी) होणार आहे. भारतीय संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. बेनोनी येथे त्याचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलिया एकूण सहाव्यांदा जेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं भारताचा 2012 आणि 2018 मध्ये पराभव केला होता. भारताच्या खात्यात एकूण पाच जेतेपदे जमा आहेत.
WTC23 Final 🔄 CWC23 Final 🔄 #U19WorldCup 2024 Final
It’s 🇮🇳 vs 🇦🇺 again! pic.twitter.com/s0v5Zpswh0
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 8, 2024
या सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने 48.5 षटकांत पाकिस्तानचा डाव 179 धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून अझान आवेश आणि अराफत मिन्हास यांनी प्रत्येकी 52-52 धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ सलामीवीर शामियाल हुसेनला दुहेरी आकडा गाठता आला. तो 17 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टारकरने सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 49.1 षटकात 9 गडी गमावत 181 धावा करत सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर हॅरी डिक्सनने सर्वाधिक 50 धावा केल्या. ऑलिव्हर पीकेचे अर्धशतक 1 धावेनं हुकले. ऑलिव्हर 49 धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय टॉम कॅम्पबेलने 25 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत अली राजाने 10 षटकात 34 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. अराफत मिन्हासला दोन यश मिळाले. नावेद अहमद खान आणि उबेद शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शेवटच्या षटकात मिळवला विजय…
एका वेळी ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स 155 धावांवर पडल्या होत्या. ऑलिव्हर पीके बाद झाल्यानंतर कांगारू संघ हा सामना हरणार असे वाटत होते. येथून खालच्या फळीतील फलंदाजांनी धैर्य दाखवले. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजीचा जोरदार सामना केला. टॉम स्टार्करने रेफ मॅकमिलनच्या साथीने धावसंख्या 164 धावांवर नेली. स्टार्कर तीन धावा करून बाद झाला. त्याला अली रझाने यष्टिरक्षक साद बेगच्या हाती झेलबाद केले. अली रझाने 46व्या षटकातच माहिल बियर्डमनला शून्यावर क्लीबोल्ड करत आणखी एक धक्का दिला. यानंतर मॅकमिलन आणि कॅलम विडलर यांनी 17 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. मॅकमिलन 29 चेंडूत 19 धावा करून नाबाद राहिला आणि विडलर 9 चेंडूत 2 धावा करून नाबाद राहिला.