मुंबई – अंगणवाडी सेविकांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला असून २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्याच पार्श्वभूमीवर महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात २५ जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळ मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेसंदर्भात देखील ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्राच्युईटी देण्याचे मान्य केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार. संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार.
संप काळात, करोना काळातील राहिलेल्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार. १० वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.