सातारा -वर्ये (ता. सातारा) येथील प्लायवूडच्या दोन दुकानांना अचानक भीषण आग लागून व्यापारी शामूलचंद ओसवाल व रूपाशेठ सोळंकी या व्यावसायिकांच्या मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानातील प्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. मात्र संबंधित दुकानांची गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
या घटनेमुळे परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. अग्निशमन यंत्रणेने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रामनगर येथील कालव्यानजीक असलेल्या प्लायवूडच्या दुकानांना साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानातील कामगारांच्या आग लागल्याचे लक्षात आले, त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी पळापळ केली. या घटनेची खबर ओसवाल व रूपाशेठ यांना देण्यात आली. दुकानात मोठ्या प्रमाणावर असलेले फर्निचर व विशेष केमिकलमुळे आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. काही क्षणांतच संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रूपाशेठ सोळंकी यांचे घर सुद्धा याच प्लायवूड गोदामाच्या पाठीमागे आहे. त्या घरालाही काही झळ पोचल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आगीने शेजारील कुटूंबातील लोक हादरून गेले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागल्यानंतर रस्त्यावर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत फर्निचरचे साहित्य आणि केमिकल सर्व जळून खाक झाले होते. गोदामाचे शेड पत्र्याचे असल्यामुळे संपूर्ण पत्रा तापून काळा पडला होता. ही आग इतकी रौद्र होती की, परिसरात उभे राहणे मुश्किल झाले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सातारा तालुका पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.