पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या डेटा सायन्स विद्याशाखेच्या सायबर सिक्युरिटी विषयातील तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी प्रसाद धेंड, वैष्णवी हांडे, क्षितिजा गोसावी आणि अनुज शुक्ला यांच्या पॉवर रेंजर्स २.० या संघाने आयआयटी खरगपूर येथे आयोजित कंपोझिट आयडियाथॉनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत भारतातून ६०० संघांनी सहभाग घेतला होता.
डीपफेक हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे. ज्याचा वापर विश्वासार्ह फसव्या प्रतिमा, ध्वनी आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. रायसोनीच्या पॉवर रेंजर्स २.० या संघाने सोल्यूशनमध्ये डीपफेक कंटेट ओळखण्यासाठी डीपशिएल्ड इन्स्पेक्टर अॅप विकसित केले. या अॅपच्या माध्यमातून इंटरनेटवरील बनावट सामग्री अथवा साहित्याची सत्यता तपासणी करता येईल.
हे अॅप वापरकर्त्यांना बनावट किंवा हाताळलेल्या सामग्रीमधून खरी माहिती ओळखण्याचे साधन उपलब्ध करते. सखोल बनावट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे पॉवर रेंजर्स २.० या संघाचा पुढाकार डिजिटल सामग्रीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि चुकीच्या माहितीपासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाची गरज पूर्ण करतो, असे सुनील रायसोनी यांनी स्पष्ट केले.
इंटरनेटवरील बनावट सामग्रीच्या प्रसाराशी लढा देणे हे या ॲपचे उद्दिष्ट आहे. डीपफेकने विविध क्षेत्रांमध्ये सेलिब्रिटींसह इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींवर लक्षणीय परिणाम केला आहे. बनावट माहितीची सत्यता पडताळणीसाठी डीपशिएल्ड इन्स्पेक्टर अॅप महत्वपूर्ण भूमिका निभावेल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
डॉ. आरती पटले, डॉ. दीपिका अजळकर, आणि डॉ. स्वप्नील महाजन यांनी पॉवर रेंजर्स २.० टीमसाठी मार्गदर्शक म्हणून काम केले. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी पॉवर रेंजर्स २.० संघाचे कौतुक केले.