पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एएफएमसी चे कमांडंट आणि संचालक लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांचा सैन्यदलातील कार्यकाळ संपल्याने ते ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल कोतवाल यांनी सशस्त्र दलात ३७ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सशस्त्र दलात उल्लेखनीय कार्य केले आहे.
जम्मू येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे ते माजी विद्यार्थी असून, १९९२ मध्ये त्यांनी एएफएमसी मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य आहेत. त्यांनी चंदीगड येथून सन २००० मध्ये एंडोक्रिनोलॉजीमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (DM) संपादन केले. नवी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज चे ते माजी विद्यार्थी आहेत. सन २०१६ मध्ये डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये त्यांनी एम.फिल. केले आहे.
भारताच्या चार माननीय राष्ट्रपतींना वैद्यकीय सेवा पुरविण्याचा मान त्यांच्याकडे होता. ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विशेषज्ञ समितीचे सदस्य देखील होते; युपीएससीचे सल्लागार,पॅनल सदस्य, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सदस्य होते. सध्या ते एंडोक्रिनोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (निवडक) आहेत आणि त्यांनी एंडोक्रिनोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि इंडियन थायरॉईड सोसायटीचे सचिव म्हणून काम केले आहे.
त्यांना विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक यांने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय लष्करांतर्गत अनेक प्रशंसनीय सन्मान त्यांना मिळाले आहेत. एएफएमसी येथील त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात एएफएमसी ला भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती रंग आणि जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ युनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले.