सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना मताधिक्क्य देण्यात शिवसेनेचा सहभाग महत्त्वाचा राहील असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे – पाटील यांनी येथे निर्धाराने सांगितले.
सातारा येथील नरिमन हॉल येथे आयोजित सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात प्रा. बानुगडे- पाटील बोलत होते. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत संघटन असून प्रत्येक शिवसैनिक गावागावात आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यावेळी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे सर्वसामान्य माणूस पेटून उठला असून गद्दारांविषयी जनतेत प्रचंड रोष आहे. त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करायचा निश्चय केला आहे. याप्रसंगी तेजस शिंदे, सुधीर राऊत, माऊली पिसाळ, सुनंदा महामुलकर, रामदास कांबळे, नंदू घाडगे, यशवंत घाडगे, सखाराम पारटे, अजित यादव, विश्वनाथ धनावडे आदी उपस्थित होते.