वडापुरी : सध्या इंदापूर तालुक्यातील अवसरी परिसरात भुईमुगाच्या शेंगाची काढणी सुरू आहे. यावर्षी विहिरी, कूपनलिकांना चांगले पाणी आहे. भीमा नदीवरील भाटनिमगाव बंधाऱ्यात पाणी आहे विहिरीतही पाणीसाठा अधिक असल्याने या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली होती, अवसरी परिसरात भुईमूग काढणीला वेग आला आहे.
उन्हाच्या झळा सोसत शेतकरी सावलीचा आडोसा करत भुईमुगाच्या शेंगा तोडताना दिसत आहे. उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न खरीप हंगामाच्या चारपट जास्त निघते, यातून मोठा फायदा होतो तर शेंगालाही मोठी मागणी असते. काही शेतकरी घरी मशीन आणून शेंगा फोडून बाजारात शेंगदाणे विकतात तर ग्रामीण भागात अनेक लोक शेंगाची खरेदी करतात.
भुईमूग पेरल्यानंतर जंगली प्राणी पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात. यामुळे पिकांना तार कंपाऊंड, बोरीच्या काट्याचे कंपाऊंड तर कधीकधी राखणही राहावे लागते.येथील शेतकरी अवसरी येथील शेतकरी सुशीलकुमार शिंदे यांनी एक एकरमध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे. त्यांच्या शेतात भुईमुगाची काढणी सुरू आहे. 30 किलो बियाणे पेरले होते.
बाजारात 50 रुपये किलोने शेंगा विकल्या जातात. भुईमुगाच्या काढणीच्या वेळेला भुईमुगाचे वेल उपटून वेलाच्या शेंगा तोडाव्या लागतात.