सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त भावाने करत होते विक्री
17 हजार 805 मास्क जप्त; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
पुणे – करोना विषाणूपासून बचावासाठी वापरण्यात येणाऱ्या एन-90 या मास्कचा साठा करून सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या होम लिंक एंटरप्राइजेसचा मालक आणि कामगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मालक भूपेश ओमप्रकाश गुप्ता (वय 46) आणि कामगार रोहन अजय शुक्ला (वय 26 दोघेही, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा रोड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत . याबाबत युनिट 1, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 21 ते 26 मार्च या कालावधीत सोमवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपासमोरील होम लिंक इंटरप्राईजेस येथे घडली.
पोलिसांनी चार लाख 30 हजार 445 रुपये किमतीचे निळे, हिरवे आणि पांढऱ्या रंगाचे 17 हजार 805 मस्त जप्त केले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत या मास्कचा साठा करण्यात आला आणि सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने याची विक्री करत असल्याच पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि सात आणि भारतीय दंड संहिता कायदा कलम 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. दोघांनी हे मास्क कोठे तयार करून घेतले अथवा कोणाकडून घेतले, त्यांच्याकडे अशा मालाचा आणखी साठा आहे का, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर अधिक तपास करत आहेत.