पिंपरी – मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची एक रिक्षा, सात दुचाकी आणि 61 हजारांची तांबे, अल्युमिनियमची भांडी असा एकूण 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इम्रान रहीम शेख (वय 19, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), अमर सुनील वाघमारे (वय 19, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शेलार आणि पोलीस शिपाई भदाणे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना रिव्हरव्ह्यू हॉटेलजवळ एका खाजगी रिक्षातून तिघेजण संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी रिक्षा चालकाला थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षा चालक न थांबता पळून गेला. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता रिक्षा चोरीची असून आणखी सात दुचाकी आणि काही भांडी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.
या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले असून पाच दुचाकीच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्निल शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पंकज भदाणे, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे.