तुळजापूर – चार समित्या व ७ महिन्यांच्या मोजणीनंतर तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक सोमनाथ माळी यांना दिले. यामध्ये मंदिराचे महंत, सेवेकरी व तत्कालीन मंदिर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींची नावे व गहाळ दागिन्यांची माहिती समोर येणार आहे.
तुळजाभवानी मंदिरातील सहायक धार्मिक व्यवस्थापक पदभार हस्तांतरणासाठी नियुक्त समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात तुळजाभवानी मातेचे अनेक प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब असल्याचे समोर आले होते. अनेक अलंकारांच्या वजनात अनपेक्षितरीत्या वाढ नोंदवली गेली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डाॅ. ओंबासे यांनी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तुळजाभवानी अलंकार नव्याने मोजणीचे आदेश देण्यात आले होते. पवार यांनी चार ऑक्टोबर रोजी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी अलंकार गायब प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी पवार यांच्याच अध्यक्षतेखाली चौथी समिती स्थापन केली होती. या मध्ये विधीज्ञांचा समावेश करण्यात आला होता. या चौथ्या समितीने मंगळवारी ( १२ डिसेंबर ) जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान चे अध्यक्ष डाॅ. सचिन ओंबासे यांना आपला अहवाल सादर केला आहे. यावेळी व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांचा सह समिती सदस्यांची उपस्थिती होती.