Women Premier League Auction 2023, Kashvee Gautam : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सत्रासाठी शनिवारी (09 डिसेंबर) मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत झालेल्या या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. एकूण 165 खेळाडूंवर बोली लावली गेली. त्यापैकी 104 भारतीय आहेत. या मिनी लिलावात चंदिगडमध्ये राहणारी 20 वर्षीय भारतीय खेळाडू काशवी गौतमने इतिहास रचला. काशवी गौतमला गुजरात जायंट्सने (GG) 2 कोटी रुपयांना त्यांच्या संघात सामील केले. काशवी गौतम आता WPL लिलावात खरेदी केलेली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली आहे. इतकेच नाही तर WPL 2024 च्या लिलावात काशवी संयुक्तपणे सर्वात महागडी खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅनाबेल सदरलँडचाही दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) 2 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला आहे.
यूटी क्रिकेट असोसिएशन (UTCA) अंडर-23 महिला संघाची कर्णधार काशवी गौतम आता महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये गुजरात जायंट्सकडून खेळेल. काशवीची मूळ किंमत फक्त 10 लाख रुपये होती, तरीही गुजरात जायंट्सने 20 पट अधिक बोली लावून तिला 2 कोटी रुपयाला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे.
WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…
मुलांसोबत खेळता-खेळता बनली क्रिकेट स्टार..
गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळणारी काशवी गौतम आज क्रिकेट विश्वातील एक उगवता तारा आहे. यूटी क्रिकेट असोसिएशनमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणाऱ्या काशवी गौतमचे वडील सुदेश शर्मा म्हणतात की, काश्वीला क्रिकेटर बनवण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. मुलं घराबाहेर गल्लीत क्रिकेट खेळायची, काशवीही त्यांच्यासोबत खेळायची. त्यांच्यासोबत खेळत असताना काशवीला हळूहळू क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली आणि ती त्यांच्यासोबत त्याच मुलांच्या संघात खेळू लागली.
ते पुढे सांगतात की, माझ्या मुलीची आवड पाहून मी तिला सेक्टर-26 क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षक नागेश गुप्ता यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. मुलींचे जास्त सामने नसल्यामुळे, प्रशिक्षक नागेश गुप्ता यांनीही काशवीचा खेळ सुधारण्यासाठी अनेक स्थानिक स्तरावरील स्पर्धांमध्ये मुलांच्या संघात तिचा समावेश केला. त्यावेळी काशवी मुलांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करायची.
कोचिंगमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून घर केलं शिफ्ट….
काशवीचे वडील सुदेश शर्मा सांगतात की, काशवीला खेळाची आवड आहे. काशवीला क्रिकेट खेळायला इतकं आवडतं की आजही लहान मुलं क्रिकेट खेळत असतील तर काशवी त्यांच्यासोबत तासन्तास क्रिकेट खेळत राहते. जेव्हा प्रशिक्षक नागेश यांनी पीरमुछाला येथे कोचिंग सुरू केले तेव्हा काशवीला सेक्टर-37 ते पीरमुछाला येथे जाण्यासाठी खूप अडचणी येत असत. त्यामुळे तिच्या सरावात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मी ढाकोलीतील ग्रीन व्हॅली टॉवरमध्ये शिफ्ट झालो.
वयाच्या 14 व्या वर्षी सुरुवात केली खेळायला….
प्रशिक्षक नागेश गुप्ता यांनी सांगितले की, 2016 मध्ये काशवी त्यांच्याकडे क्रिकेट शिकण्यासाठी आली होती. त्यावेळी ती 14 वर्षांची होती. प्रत्येक क्रिकेटपटूला सुरुवातीला फलंदाज व्हायचे असले तरी त्याचे गुण फक्त प्रशिक्षक ओळखतात. काशवीच्या गोलंदाजीत मी सुरुवातीपासूनच स्विंग पाहिली. मग आम्ही तिच्या गोलंदाजीच्या अचूकतेवर आणि वेगावर काम केले आणि काशवीला अष्टपैलू बनवण्यासाठी तिच्या फलंदाजीवरही काम केले.
काशवी खूप मेहनती आहे आणि तिला पुन्हा पुन्हा काहीही समजावून सांगावे लागत नाही. याचा परिणाम म्हणजे काशवी संघाच्या गरजेनुसार मैदानात चांगली कामगिरी करत आहे. काशवीने सीनियर स्टेट, नॉर्थ झोन आणि इंडिया अ साठी चांगली कामगिरी केली आहे, दुसरे म्हणजे ती एक अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे गुजरात जायंट्सने तिच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
काशवीने प्रत्येकवेळी स्वत:ला केलं सिद्ध…
यूटी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय टंडन म्हणाले की, बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये खेळणारे सर्व खेळाडू तांत्रिकदृष्ट्या सारखेच असतात. असे असूनही, काही खेळाडू मोठ्या प्रसंगी चांगल्या जबाबदारीने स्वत:ला सिद्ध करतात. काशवीने प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध केले आहे. यामुळेच तिने आज हे स्थान मिळवले आहे. यावेळी टंडन यांनी बीसीसीआयचे आभारही मानले. ते म्हणाले की, बीसीसीआयने यूटीसीएला मान्यता दिली नसती तर असे टॅलेंट रस्त्यावर क्रिकेट खेळण्यापुरते मर्यादित राहिले असते.
काशवीने केला आहे विशेष विक्रम …
फेब्रुवारी 2020 मध्ये काशवी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. त्यावेळी काशवीने अंडर-19 ट्रॉफीमध्ये चंदीगडकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या डावात 10 विकेट घेतल्या. या काळात तिने हॅट्ट्रिकही घेतली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी काशवी ही पहिली भारतीय गोलंदाज आहे. म्हणजेच तिने पुरुष गोलंदाजांनाही मागे टाकले आणि एकदिवसीय स्पर्धेत हा चमत्कार घडवला.
देशांतर्गत स्तरावर काशवीचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. महिला वरिष्ठ T20 ट्रॉफी 2023 मध्ये, काशवीने केवळ सात सामन्यांमध्ये 12 बळी घेत तिचे गोलंदाजी कौशल्य दाखवले. या काळात काशवीचा इकॉनॉमी रेट 4.14 धावा होता. काशवीने हाँगकाँग येथे झालेल्या एसीसी इमर्जिंग स्पर्धेतही चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.