मुंबई – राज्यात एसटी महामंडळ लवकरच कात टाकणार असून महामंडळाच्या तब्बल ५००० बसेसचे डिझेल इंजिन एलएनजीमध्ये (लिक्विफाइड नॅचरल गॅस) मध्ये रूपांतरित केले जाणार आहे. त्यामुळे या सर्व बसेस एलएनजीवर धावणार आहेत. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या असून पुढील काही दिवसांतच सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे डिझेल गाड्यांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणार आहे.
राज्यात महामंडळाने पर्यावरणपूरक धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यात इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत. पुढील दोन वर्षांपर्यंत ५१५० इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस तयार करण्याचे काम सुरू असून पुढील काही दिवसांतच वीस बसेस दाखल होतील.
या बसेस चार्जिंग करण्यासाठी ७१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन तयार केले जाणार असून याशिवाय १०१ ठिकाणी डेपो वचार्जिंग स्टेशन असणार आहेत. या डेपोमध्ये बसेसची दुरुस्ती होणार आहे. यामध्ये ९ मीटर व १२ मीटरलांबीच्या बसगाड्या असून ९मीटरमध्ये ३४ प्रवासी तर १२ मीटरमध्ये ४४ प्रवाशांची क्षमता आहे. एका चार्जिंगमध्ये ९ मीटर बस २०० किलोमीटर तर १२ मीटरची बस ३०० किलोमीटर धावणार आहे. यादोन्ही बसेस वातानुकूलित असणार आहेत.
यासोबतच महामंडळाने त्यांच्याकडे असलेल्या १५ हजार बसगाड्यांपैकी ५००० बसगाड्या डिझेलमधून एलएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्या रूपांतरित करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली आहे. त्यातून काही कंपनीसोबत करारही करण्यात आला आहे. याबसेसमध्ये गॅस भरण्यासाठी ९० ठिकाणी डेपो होणार आहेत. त्याबाबत शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सात ते आठ वर्षे वयोमर्यादा झालेल्या बसेसचे रूपांतर केले जाणार आहे. या सर्व बसेसची माहिती घेतली जात आहे. या बसेसचे तिकीटदर देखील सध्याच्या दरानुसार राहणार आहेत.
इलेक्ट्रिक बसचे भाडे ठरवण्यासाठी समिती
राज्यातील आगारांना मिळणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित असणार आहेत. या बसेसचे भाडे ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अभ्यासानंतर या बसेसचे भाडे ठरवले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातून या बसेसमधून वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
गॅस भरण्यासाठी ९० ठिकाणी डेपो होणार
१००० बसगाड्या सीएनजीवर धावणार असून या बस गाड्यांचे इंजिन बदलले जाणार आहे. सीएनजी भरण्यासाठी १४ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. सध्या विठ्ठलवाडी, शिरूर, चिपळूण येथेसीएनजी भरण्याची ठिकाणे कार्यान्वित झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.