सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री तुळजा भवानी मातेच्या (Tulajabhavani Mata) दरबारात रविवारी ‘आई राजा उदो उदो’च्या (Aai rajacha udo udo) गजरात शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला.
संभळाच्या निनादात श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारातील सिंह गाभाऱ्यात वैदिक मंत्रोपचारात घटस्थापना केली. तत्पूर्वी श्री तुळजा भवानी मातेच्या 9 दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर श्री देवीची मुख्य चल मुर्ती पहाटे शेजघरातुन आणुन पहाटे “आई राजा उदो उदो’च्या गजरात सिंहासनावर प्रतिष्ठापणा करण्यात आली.(Tulajabhavani temple)
मुख्य सोहळ्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरातील परिवार देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी, यमाई देवी, जेजुरी खंडोबा, लक्ष्मी-नरसिंह मंदिरातही घटस्थापनेचा विधी पार पडला.
दरम्यान, दररोज लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तुळजाभवानी मातेच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थानने तयारी केली असून नवरात्रात दररोज मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. पहाटे चरणतीर्थ पूजेने तुळजाभवानी मातेच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे. तर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास छबिना मिरवणूक, प्रक्षाल पूजेनंतर दर्शन बंद करण्यात येणार आहे. देवीचा मुख्य गाभारा जरी प्रक्षाळ पूजेनंतर बंद करण्यात येणार असला तरी उर्वरित मंदिर खुलेच राहणार आहे.
छत्रपतींच्या घराण्याच्या दागिन्यांचा साज
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला अनेक प्रकारचे दागदागिने आहेत. ज्यांची किमया, तुलना इतर कुठल्याही दागिन्यांशी होऊ शकत नाही. मात्र शारदीय नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेला मातेच्या मुख्य मूर्तीला छत्रपतींच्या घराण्याकडून अर्पण झालेल्या दागदागिन्यांचा साज चढविण्यात येतो. या दागिन्यांच्या पेटीला एक क्रमांक देण्यात आला आहे. या दागिन्यांच्या वेशात असलेली मुख्य मूर्ती अत्यंत शोभून दिसते. परिणामी पुजाऱ्यांकरवी मूर्तीची दृष्ट काढली जाते.