नगर -नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या पालखीचे आगमन मंगळवारी सकाळी तीसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथे उत्साहात झाले. येथील श्री अंबिका तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबीयांकडून तुळजापुर पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत व पूजन दुपारी 12 वाजता करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी ऍड. विजय भगत व सौ.दुर्गा भगत यांनी साडीचोळी, पुष्पहार अर्पण करून पालखीची विधिवत पूजा केली. पुजारी ऍड.अभिषेक भगत व कविता भगत यांनी पालखीची आरती केली. यावेळी आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, बोल असा जयघोष भाविकांनी केला.
शहरापासून 4 किलोमीटरवर असलेल्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिर शहरातील व तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. तुळजाभवानी मातेचे बुऱ्हाणनगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर आहे. हा पलंग- पालखी नवरात्रीच्या नवव्या माळेला तुळजापूर येथे पोहोचतो. या पालखीतून नवमीला देवीची मिरवणूक काढतात. ऍड. विजय भगत व ऍड. अभिषेक भगत हे सध्या मंदिराची व्यवस्था पाहतात.