नवी दिल्ली: दिल्लीतील तुघलकाबादमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 91 जणांना अटक करण्यात आली आहे. यात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, आज सकाळपासून या संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे. दिल्ली पोलिसांसह पॅरामिलिट्रीचे जवानदेखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
तुघलकाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री 15 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते तर अनेकांनी याठिकाणी असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या सर्व 91 जणांवर दंगल करणे, सरकारी आणि खासगी संपत्तीचे नुकसान करण्याचे आरोप लावले आहेत. तसेच अटक केलेल्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तुघलकाबादमधील रविदास मंदीर तोडण्यात आले आहे, याचाच विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर दलित बांधव एकत्र आले होते. या आंदोलनात दलित समाजाचे नेते भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत राज्य सरकारचे मंत्री राजेंद्र पालदेखील सहभागी झाले होते. या विरोध पदर्शनात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या दलित समाजातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.