उदयनराजेंकडून “वेट अँड वॉच’चा मेसेज

भाजप प्रवेशाची केवळ चर्चाच, कार्यकर्त्यांची मते आजमावणार

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींवर स्वतः उदयनराजे यांनी पुण्यातून “वेट अँड वॉच’चा मेसेज दिल्याने राजेंच्या प्रवेश हालचालीची केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झाल्याचे आज तरी स्पष्ट झाले. उदयनराजे स्वतः साताऱ्यात येऊन कार्यकर्त्यांची मते अजमावणार असल्याचे खासदार गोटातून सांगण्यात आले. भाजपच्या मुंबईतील जनसंपर्क सूत्रांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा इन्कार सध्या तरी केल्याने राजेशाही प्रवेशांच्या ब्रेकिंग न्यूजला सध्या तरी ब्रेक लागला आहे.

पूरग्रस्तांसह साताऱ्यातील विकास कामांना तातडीने निधी देण्याच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन चाळीस मिनिटे कमराबंद चर्चा केली. त्याला राजेंच्या भाजप प्रवेशाचा राजकीय रंग चढला. त्यानंतर लगोलग आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने साताऱ्याचा राजकीय पारा वाढला. शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय स्वरुपाची होती याचा इन्कार केला.

खासदार गट आणि भाजपच्या संपर्क सूत्रांनी दोन्ही बाजूंनी या राजकीय घडामोडींवर चुप्पी साधल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली या केवळ चर्चाच ठरल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व उदयनराजे यांना एकाच व्यासपीठावरून भाजपमध्ये आणण्याचे संदर्भ भाजपच्याच गोटातून दिले जात असले तरी राजे प्रवेशाची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता दोन्ही गटांकडून चुप्पी साधली गेली आहे. साताऱ्यात उदयनराजे येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×