भरूच – पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून गुजरातमध्ये एकाला अटक करण्यात आली. प्रवीण मिश्रा असे त्याचे नाव आहे. गुजरातच्या भरूच जिल्ह्यात राहणारा प्रवीण मूळचा बिहारमधील आहे. लष्करी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला पकडण्यात आले. भारतीय सशस्त्र दले आणि संरक्षण संस्थांशी संबंधित गोपनीय माहिती प्रवीणने मिळवली. (suspected of spying for Pakistan; One arrested in Gujarat )
ती माहिती तो सोशल मीडियावरून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकाला पुरवत होता. त्या बाबीचा सुगावा लागल्यावर लष्करी गुप्तचरांनी गुजरातच्या गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) अलर्ट केले. त्यानंतर प्रवीणच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. आता अटकेनंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या नापाक कृत्यांमध्ये स्थानिक पातळीवर इतर कुणी सामील आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे.