सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओरोस येथे आज जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलिसाने केले. त्यामुळे त्या भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हटल्यावर पोलिसांचा भलामोठा ताफा, तितकीच कडक सुरक्षा. हे सर्व असताना आज सिंधुदुर्गात एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. अजित पवार ज्या गाडीने प्रवास करत होते त्या गाडीचं सारथ्य थेट महिला पोलीस तृप्ती मुळीक करत होत्या. उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारर्थ्य एक कर्तबगार महिला पोलीस करत असल्याने त्याची राज्यभरात दिवसभर चर्चा रंगली.
दरम्यान, राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी. राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.