वॉशिंग्टन – शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन योग्यच आहे, असे समर्थन व्हाईट हाऊसच्यावतीने आज करण्यात आले. इस्राईल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील महत्वाच्या करारासाठी मध्यस्थी केल्याने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ट्रम्प पात्र ठरू शकतात, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. शांतता हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा पायाच ट्रम्प यांनी मानला आहे, असेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
नॉर्वेतील उजव्या विचारसरणीचे लोकप्रतिनिधी ख्रिस्चियन टायब्रिंग ग्जेड यांनी बुधवारी ट्रम्प यांना इसाईल-युएई दरम्यानच्या करारासाठी मध्यस्थी केल्याबद्दल शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशित केले. हा करार म्हणजे मध्यपूर्वेतील शांततेच्या दिशेने एक मैलाचा दगड मानला जात आहे.
इस्राईल आणि युएईने परस्परांमध्ये पूर्ण मुत्सदी पातळीवरील संबंध प्रस्थापित करीत असल्याचे 13 ऑगस्ट रोजी जाहीर केले आहे. इस्रायल आणि युएई दरम्यानचे संबंध सर्वसामान्य झाल्यानंतर पहिली व्यावसायिक विमानसेवा 31 ऑगस्ट रोजी सुरू झाली. पहिले विमान इस्राईलमधून निघून अबू धाबी येथे दाखल झाले.
व्हाईट हाऊसमध्ये 15 सप्टेंबर रोजी हा करार होणार आहे. इस्राईलशी राजनैतिक संबंध जोडणारा संयुक्त अरब अमिराती हा अरब देशांमधील तिसराच देश आहे. इजिप्त आणि जॉर्डनने यापूर्वीच इस्राईलला मान्यता दिली आहे. इस्राईल आणि युएईमध्ये मध्यस्थी घडवून आणणे ही ट्रम्प यांची मोठी कामगिरी असल्यानेच ते शांततेच्या नोबेल पुरस्कारास पात्र असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.