चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा

मॉस्को – पूर्व लडाखमध्ये सीमेवरील तणाव कायम असताना परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये आठवडाभराच्या कालावधीत मंत्रिस्तरावरील दुसरी उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकांतून तणाव कमी होण्याच्या दृष्टीने मार्ग निघणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोत शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी आलेल्या जयशंकर आणि वांग यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही. पण, सीमेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

याआधी मॉस्कोतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघई यांची बैठक झाली. संरक्षण मंत्र्यांमधील चर्चेनंतरही दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आल्याची घटना घडली. त्यावेळी गोळीबाराची घटना घडल्याने सीमेवरील स्थिती आणखीच गंभीर बनल्याचे चित्र निर्माण झाले. संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेतून तणाव निवळण्याच्या दृष्टीने काहीच न घडल्याने परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतून तरी स्थिती सुधारणार का, याविषयी आता उत्सुकता आहे.

भारतीय लष्कराची आता उंचीवरही मजबूत आघाडी

चिनी कुरापतींमुळे चार महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. सीमेलगत म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत चिनी सैनिकांच्या हालचाली सुरूच आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराने आपल्या सज्जतेत आणखी वाढ केली आहे. पूर्व लडाखच्या पॅंगॉंग त्सो तलावाच्या परिसरातील उंचावरील ठिकाणीही भारतीय जवान तैनात झाले आहेत. भारतीय लष्कराने आता उंचीवरही आपली आघाडी मजबूत केल्याने चिनी हालचालींवर बारीक नजर ठेवता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.