नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मंगळवारी १५ राज्यांमध्ये झालेल्या प्रायमरीच्या मतदानामध्ये अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाकडून मोठी बाजी मारली आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बायडेन आणि ट्रम्प हे आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत आणि ट्रम्प यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी निकी हेले यांच्यावर मात्र आता मोठे दडपण आले आहे.
मंगळवारच्या प्रायमरीदरम्यान रिपब्लिकन उमेदवारीसाठी ट्रम्प यांनी हेले यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे. ट्रम्प यांनी टेक्सास, कॅलिफोर्नियासह अन्य ११ राज्यांमधूल रिपब्लिकन सदस्यांचा पाठिंबा मिळवला आहे. तर निकी हेले यांना वेरमोंटमध्ये विजय मिळाला आहे.
मात्र येथेही त्यांना केवळ एक टक्क्याची आघाडी मिळाली आहे. या १५ राज्यांमध्ये मिळूनही ट्रम्प यांच्याकडे रिपब्लिकन सदस्यांचे पुरेसे संख्याबळ जमा झाले नाही. मात्र ते बहुमताच्या खूप जवळ जाऊन पोचले आहेत.
पक्षाची अंतिम उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला प्रायमरीमध्ये निवडल्या गेलेल्या १,२१५ रिपब्लिकन सदस्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक असते. मंगळवारच्या १५ राज्यांमधील प्रायमरीनंतर ट्रम्प यांच्याकडे २४४ सदस्यांचा पाठिंबा आहे. तर निकी हेले यांच्याकडे अवघ्या ८६ सदस्य आहेत.
पुन्हा अध्यक्ष बनण्यासाठी बायडेन यांचे प्रयत्न…
दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाकडून पुन्हा उमोदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षासाठीच्या बहुतेक सर्व राज्यांच्या प्रायमरीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत अमेरिकन सामाना प्रांतात जेसन पामर यांच्याकडून एकदाच पराभव स्वीकारावा लागला आहे. पामर यांचा विजय नाममात्र असला तरी बायडेन यांच्या मार्गात आता ते अडथळा बनले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये बायडेन यांना अन्य कोणीही आव्हान देणारा मोठा नेता नाही. आतापर्यंतच्या बहुतेक प्रायमरीमध्ये बायडेन विजयी झाल्यामुळे अंतिम उमेदवारी त्यांनाच मिळण्याची शक्यता जास्त आहे.