ग्रीनव्हिल – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःची तुलना रशियातील दिवंगत विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी यांच्याशी केली आहे. आपल्याला गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यांमध्ये नवालनी यांच्याप्रमाणेच गोवण्यात आले आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी नवालनी यांच्याशी स्वतःची तुलना दुसर् यावेळी केली आहे. साऊथ कॅरोलिनातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हाच दावा केला होता. त्यानंतर उघड कार्यक्रमात बोलताना देखील ट्रम्प यांनी स्वतःला नवालनी यांच्याप्रमाणे खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
नवानली यांना ज्याप्रमाणे पुतीन यांनी खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवले, त्याच प्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि व्हाईट हाऊस आपल्यालाही खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून आपण दूर रहावे, यासाठी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपण या निवडणुकीपासून दूर राहू शकलो असतो.
तसे केले असते कोंवा देशाबाहेर राहून बोललो असतो, तर आपल्यासाठीही ते अधिक चांगले झाले असते. कारण काय होऊ शकते, याची लोकांना भीती वाटतच होती आणि तसेच झाले आहे. हे आपल्याच देशात घडते आहे हे अतिशय भयानक आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
२०२० मध्ये अद्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची दोन प्रकरणे दाखल झाली आहेत. याशिवाय अन्य प्रकरणात दोषीही ठरवले गेले आहे. या प्रकरणांमुळे अमेरिका कम्युनिस्ट देश बनत चालला आहे, हे सिद्ध होते, असे देखील ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्यापेक्षा व्हाईट हाऊसमधील बायडेन यांना आपले प्राधान्य आहे, असे पुतीन यांनी अलीकडेच म्हटले होते. ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाच्या खर्चावर रशियाचा प्रभाव होता, असे २०१६ आणि २०२० या दोन्ही निवडणुकांबाबत अमेरिकेच्या गुप्तचरांच्या माहितीमध्ये असे आढळून आले आहे.
३५५ दशलक्ष डॉलरचा दंड !
ट्रम्प यांना गेल्याच आठवड्यात एका खटल्यात संपत्तीबाबतची कोठी माहिती दिल्याबद्दल ३५५ दशलक्ष डॉलरचा दंड करण्यात आला आहे. व्याजासह ट्रम्प यांना ४५४ दशलक्ष डॉलर सरकारी तिजोरीमध्ये भरावे लागणार आहेत.