नगर -नगर-सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी शिवारात कॅन्टोमेन्ट जकात नाक्याजवळ कांद्याच्या गोण्याखाली तंबाखूजन्य पदार्थांची अवौध वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. दोघांना जेरबंद करण्यात आले असून 5 लाख 42 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी सलीम युसुफ शेख (वय-24 रा.भारत नगर, वाळुज ता.गंगापुर जि.औरंगाबाद), संतोष अशोक शिंदे (वय-34 रा.श्रध्दानगर, बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर कडून येणाऱ्या टेंम्पो (क्र.एम एच 20 ई. जी. 8919) मध्ये राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने कांद्याच्या गोण्याखाली लपवुन अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष लोढे, रवींद्र कर्डिले, रोहीत मिसाळ, प्रकाश वाघ, राहुल सोळंके यांनी सोलापूर रस्त्यावर दरेवाडी परिसरात सापळा रचवून वाहन थांबविले. व त्याची तपासणी केली असता 20 कांद्याच्या गोण्याखाली लपवलेला हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा हिरा मिक्स तबाखुचे पोते असा वाहानासह एकुण 5 लाख 42 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई बाबत जिल्हा अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे देण्यात आला आहे.