…प्रसंगी मार्ग बदलून लॉकडाऊन काळात गर्भवती, चिमुकल्यांना पोहचवले रुग्णालयात
पुणे – रुग्णवाहिकेअभावी रस्त्यात ताटकळत थांबणाऱ्या दोन गर्भवती महिलांना पीएमपीने वेळेत रुग्णालयात पोहचविल्याने आधार मिळाला. करोनाच्या भीतीने खासगी रुग्णवाहिका रस्त्यावर येत नाहीत. या परिस्थितीत पीएमपी बस शहरातील रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे.
करोनाचा पार्श्वभूमीवर पीएमपीतर्फे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा देण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी रुग्णवाहिकेअभावी रस्त्यात ताटकळत थांबणाऱ्या दोन गर्भवती महिलांना पीएमपीने वेळेत रुग्णालयात पोहचविले. याशिवाय रूग्णालयात चालत जाणाऱ्या बाळाला पीएमपीने आपल्या मार्गात बदल करत रुग्णालयात पोहचविले. यामुळे चालक वाहकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नऱ्हे परिसरात राहणाऱ्या दोन वर्षाच्या बाळाला रक्ताचा कर्करोग आहे. एरंडवणे भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
त्या बाळाची गुरूवारी नियमित तपासणी होणार होती. रुग्णालयात जाण्यासाठी बाळाच्या आई-वडिलांनी रुग्णवाहिका, वाहनसाठी प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. साधारण दीड किलोमिटर चालत गेल्यानंतर त्यांनी पीएमपी बसला हात दाखवला आणि संबंधित चालकाने त्यांना दीनानाथ रुग्णालयात सोडले. अभिरूची मॉलसमोरून लहान बाळाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या दाम्पत्याला पीएमपी बसमुळे मदत मिळाली. बसमधील वाहक विशाल मासुळे आणि चालक अक्षयकुमार भोसले यांनी तत्परता दाखवत बसचा मार्ग बदलून बाळाला रुग्णालयात दाखल केले.
अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपी बस सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी आठच्या दरम्यान बाळाला घेऊन दोघे जण सिंहगड रस्त्याने चालतांना दिसले. त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी रूग्णालयात जात असल्याचे सांगितले. अशावेळी कुठलाही विचार न करता त्या बाळाला रूग्णालयात सोडले.
– विशाल मासुळे, पीएमपीचे वाहक