प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते रजेवर असून, ते रुजू होईपर्यंत राव यांच्याकडेच जबाबदारी राहणार आहे.
महापालिकेवर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकपदाची मुदत संपत असल्याने त्यांच्या जागी राव यांची नियुक्ती करण्यात आल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या चर्चेस दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, या चर्चेमुळे महापालिका आयुक्तांची बदली होणार असल्याची चर्चा आहे.
महापालिकेची मुदत संपल्याने राज्य शासनाने महापालिकेवर 15 मार्च 2022 पासून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, या कालावधीत ओबीसी आरक्षणाच्या याचिकांची सुनावणी सुरू असल्याने अद्याप राज्यातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यातच, महापालिकेच्या प्रशासकपदाची मुदत 15 सप्टेंबरला संपलेली आहे, तर महापालिका आयुक्तही वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे वैद्यकीय रजेचे कारण देत नगरविकास विभागाकडून आयुक्तांचा पदभार विभागीय आयुक्त राव यांच्याकडे देण्यात आला आहे.
तात्पुरता पदभार की बदली?
शासनाच्या या निर्णयामुळे महापालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे, यापूर्वी महापालिका आयुक्त सुट्टीवर असताना त्यांचा पदभार महापालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रतिनियुक्तीने आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे दिला जात होता. मात्र, पहिल्यांदाच हा पदभार विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि डॉ. कुणाल खेमनार आहेत. दरम्यान, एका बाजूला महापालिका आयुक्त रजेवर असतानाच पावसामुळे शहरात पालिकेच्या कारभाराची दाणादाण उडालेली असतानाच आता पालिकेचा अतिरिक्त भार विभागीय आयुक्तांकडे असणार असल्याने त्याचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.