पिंपरी -डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते. यासाठी 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत आरोग्य विभागाने शहरातील 2 लाख 7 हजार 46 घरांची तपासणी करून 10 लाख 54 हजार 952 कंटेनरची तपासणी केली. यामध्ये 4 हजार 533 कंटेनरमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत.
शहरात डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या सोसायटी, भंगार दुकाने, टायर दुकाने अशा आस्थापनांना 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत 2 लाख 7 हजार 46 घरांची तपासणी करून 10 लाख 54 हजार 952 कंटेनरची तपासणी केली. यामध्ये 4 हजार 533 कंटेनरमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत. 838 टायर आणि भंगार दुकाने, 645 बांधकामांची तपासणी करून 3 हजार 457 कंटेनर रिकामे केले. 1 हजार 514 कंटेनर्समध्ये औषध टाकले. तर 1024 जणांना नोटीस दिल्या.
अळ्या आढळून आलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून तब्बल 15 लाख 68 हजार 527 रूपयांचा दंड वसूल केला. घरगुती आस्थापनांना 1 हजार, व्यावसायिक अस्थापनांना 2 हजार तर मॉल, हॉस्पिटल, बांधकाम सुरू असलेल्या इमारत यांना 10 हजारांचा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यांतून, तसेच रुग्णालये, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहेत.
डास उत्पती होऊ नये म्हणून काळजी घ्या
नागरिकांनी पाणी साठवून ठेऊ नये, ठेवल्यास पाणी झाकून ठेवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, स्वच्छ पाण्यातच डेंग्यूचे डास अळ्यांची पैदास करतात. त्यामुळे फ्लॉवर पॉट, फ्रिजच्या मागील ट्रे, टेरेसवर, भंगारामध्ये, टायरमध्ये पाणी साठणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.