पुणे -पुणे-मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाटांत अत्यंत दिमाखात मार्गाक्रमण करणारी, देशातील पहिली सुपरफास्ट ट्रेन असा लौकिक असणारी पुणेकरांची लाडकी “डेक्कन क्वीन’ गेली 93 वर्षे या मार्गावरील प्रवाशांची “लाइफलाइन’ आहे. दि.1 जून 2023 रोजी ही “दख्खनची राणी’ 94 व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला (जीआयपी) रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून दि. 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर “डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस सुरू केली होती. धुरांच्या रेषा हवेत उडवत धावणारी ही ट्रेन आता नव्या रंगात एलएचबी डब्यासह दख्खनची राणी धावत आहे. ही भारतातील पहिली अतिजलद ट्रेन राहिली आहे. सुरुवातीला या ट्रेनद्वारे फक्त ब्रिटिश अधिकारीच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे 1943 मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून प्रवाशांचा ओघ आजही आहे. आशिया खंडातील विद्युतीकरणावर धावणारी पहिली इंटरसिटी ट्रेनही डेक्कन क्वीन आहे. सुरुवातीला, ट्रेन 7 डब्यांच्या 2 रेकसह सादर करण्यात आली होती.
अशी आहे डेक्कन क्वीन
रेल्वेच्या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्ट्य असलेली डायनिंग कार (चाकावरचे उपहारगृह )आहे. आता डेक्कन क्वीनला निळ्या व पांढऱ्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. या गाडीचे डब्बे एलएचबी एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्यानेही गाडी नव्या साजात प्रवाशांना सेवा देत आहे. नव्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस 16 कोच आहे. ज्यामध्ये चार एसी चेअर कार, 8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.
आज कार्यक्रम
आज डेक्कन क्वीनचा 94 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी पावणेसात वाजता केक कापून आणि लोको पायलटचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रेन मुंबईकडे रवाना होईल. वाढदिवस साजरा होणारी डेक्कन क्वीन ही जगातील एकमेव ट्रेन आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.