कोयनानगर -कोयना भागातील काडोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासकीय नियम धाब्यावर बसवून, तसेच शासनाची फसवणूक करून गट नं 12/1 मध्ये बिगरशेती केलेल्या जागेवर आयुर्वेदिक व्हिलेजच्या नावाखाली आलिशान रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. बिगरशेती करण्यापासून ते रिसॉर्ट उभारण्यापर्यंत सर्व गोष्टी रिसॉर्ट मालकाने शासकीय नियमांची पायमल्ली करून केल्या आहेत. या रिसॉर्टसाठी स्वतंत्र रोड काढण्याचे आदेश असताना गावांसाठी असलेला रस्ता या रिसॉर्ट चालकाने वापर करून शासनाने रिसॉर्टसाठी रस्ता काढण्याचे दिलेले आदेशही धाब्यावर बसवून हा रस्ताच गायब केला आहे. आयुर्वेदिक व्हिलेजच्या नावाखाली बांधण्यात आलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असून त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काडोलीचे सरपंच लक्ष्मण येडगे व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पाटण तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काडोली गावच्या सर्व्हे नं.12 मध्ये चंद्रकांत पवार, रागिनी पवार व शशिकला पवार यांनी बिगरशेती प्लॉट करून मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. सदर बिगरशेती करतेवेळी शासकीय मोजणी करताना संबधित सर्व्हे नंबरमधील कोणताच शेतकरी उपस्थित नसताना त्यांच्या बोगस व खोट्या सह्या करून पोट हिस्सा केला आहे. त्या पोटहिस्यावर संबधित सर्व्हे नंबरमधील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
त्याचबरोबर गट नं. 12/1 मधून जाणारा रस्ता त्यांच्या शेतातून जात नसून नेरळे-मेंढेघर रोडपासून सर्व्हे नं. 12/1 पर्यंतचे क्षेत्र सर्व्हे नं. 1े मधील आहे. गट क्र. 12/1 मध्ये जाणारा रस्ता रिसॉर्ट मालक पवार यांच्या जागेतून जात नसल्याने त्यांना बिगरशेती परवाना देतानाच रस्ता काढण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. याच ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याची जागा आपलीच असल्याचे दाखवून रिसॉर्ट मालक पवार यांनी खोटा जबाब प्रतिज्ञापत्रात जोडला आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करून सर्व बोगस कागदपत्रे व पुरावे जोडून बिगरशेती परवाना घेतला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी सरपंच लक्ष्मण येडगे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, याबाबत तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी असणाऱ्यावर तात्काळ कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आल्या आहेत.