पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या शिफ्टसाठी सन २०२४-२५ साठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिलेली आहे.
सन २०११- १२ पासून ठाणे, सोलापूर, जळगाव, नांदेड, यवतमाळ, मुंबई शहर व मुंबई उपनगर या ७ ठिकाणी सन २०१२- १३ पासून रत्नागिरी, कराड, ब्रह्मपुरी, जालना, अंबड या ५ ठिकाणी व सन २०१४-१५ पासून पुणे, लातूर, हिंगोली या ३ ठिकाणी अशा एकूण १५ ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी शिफ्ट सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार सन २०२४-२५ वर्षात वेतन व इतर उद्दिष्टांसाठी ३४ कोटी ७० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय संचालक यांनी निधी वितरीत करण्याची विनंती केली आहे.
या योजनेंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊन त्याचा तपशील वेळोवेळी अल्पसंख्याक विकास विभागास सादर करावा लागणार आहे. अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे व खर्च मंजूर केलेल्या निधीच्या मर्यादेत ठेवण्यात यावा. केलेल्या खर्चाचा तपशील व उपयोगिता प्रमाणपत्र मुदतीत शासनास आणि महालेखापाल कार्यालयास सादर करण्याची आणि महालेखापालांच्या लेख्याशी खर्चाचा ताळमेळ घालण्याची जबाबदारी संचालकांची राहणार आहे.
रक्कम वितरीत करण्यापूर्वी संचालक यांनी शासनाने यासंदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णय, कार्यालयीन आदेश, वित्तीय कार्यपद्धती आणि वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचा अवलंब करावा लागणार आहे.