नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशात गेल्या काही महिन्यांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असताना आता मात्र करोना रुग्ण वाढताना दिसत आहे.
गेल्या आठवड्याभरात देशातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. 8 फेब्रुवारीला होळी आहे. देशभरात होळी सण मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात येईल. मात्र यावेळी करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
देशात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात देशातील करोना रुग्णांच्या संख्येतच झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात देशातील करोना रुग्णांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी करोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.