पिंपरी, (प्रतिनिधी) – मराठीतील कला, साहित्य आणि संस्कृती समृद्ध असून ते प्रसिद्ध देखील आहे. मराठी चित्रपट अमराठी रसिकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. अमराठी रसिक सब टायटल दिलेले मराठी सिनेमा आवडीने पाहतात. मात्र मराठी रसिकांचे मराठी चित्रपटावर कुठेतरी प्रेम कमी पडत आहे.
अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन च्या वतीने सौ.कुलकर्णी यांना कलाविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, हभप शेखर महाराज जांभुळकर, माजी नगरसेवक नाना काटे, शत्रूघ्न काटे, पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसाठ, पं.रवींद्र गांगुर्डे, प्रयोजक संतोष काटे,धनंजय भिसे, गणेश भिसे,अरुण चाबूकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
दाक्षिणात्य चित्रपट भरभरून गल्ला करतो तसे मराठी चित्रपटाबाबतीत दिसून येत नाही.असा प्रश्न फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी मुलाखती घेताना कुलकर्णी यांना विचारला असता त्या म्हणाल्या कि, पैसे खर्च करून थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाण्याची रसिकांची तयारी नाही हे दुर्दैव आहे.
मल्टीप्लेक्समध्ये तीन प्रकारचे सिनेमे लागलेले असतात. त्यावेळी मराठी रसिक सर्वप्रथम हिंदी सिनेमा बघण्याला प्राधान्य देतो. नंतर एखादा पुरस्कार विजेता मग शेवटी मराठी बघू असे तो ठरवतो. मात्र शनिवार – रविवारला थिएटरमध्ये गर्दी नसेल तर तो सिनेमा चित्रपट गृहातून दुसऱ्या हप्त्यात काढला जातो.
प्रभुणे म्हणाले कि, मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो.नी दांडेकर यांचे माझ्यावर ऋण आहे. दांडेकर यांचा सहवास लाभला हे थोरच. नाट्य,कला, साहित्य अशा वातावरणात अभिनेत्री म्हणून घडल्या. गायकीच्या घराण्यासारखे हे घराणे तयार झालेत. फौंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात विजय भिसे हे उगवते नेतृत्व तयार झालेत.
शत्रुघ्न काटे म्हणाले कि, शहरातील सांस्कृतिक भूक भागविण्याचे कार्य भिसे हे फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहे. सूत्रसंचालन संतोष घुले आणि ओमकार दीक्षित यांनी तर आभार सतीश इंगळे यांनी मानले.