रुग्णांची प्रकृती स्थिर : पाच संशयितांपैकी तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आढळलेल्या पाच संशयित रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आला असून, या तिघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांवरही महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. लागण झाली असली तरी या तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित दोघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
शहरातील करोनाची सद्यस्थिती तिघांना झालेली लागण आणि इतर बाबींची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हर्डीकर बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सत्ताधारी पक्षाचे नेते व पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला असून वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत. तसेच भोसरीतील नवीन रुग्णालयात आज सायंकाळपर्यंत 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार होत असून उद्यापर्यंत हा वॉर्ड 60 खाटांचा तयार करण्यात येईल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
चीनमध्ये करोना व्हायरसने दहशत माजविली असताना हा व्हायरस भारतात दाखल झाला आहे. करोनाने पुण्यानंतर आता पिंपरीतही शिरकाव केला आहे. पुण्यात पाच कोरोनाचे रुग्ण आढळले आढळल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील पाच संशयित पैकी तीन रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. हे तीनही रुग्ण दुबईला सहलीसाठी गेले होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, वायसीएम मध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांचे घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 14 दिवस नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रबोधनही सुरू
मोठे चौक, प्रभाग कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, खासगी रुग्णालये अशा 164 ठिकाणी जनजागृतीचे फलक लावले आहेत. पत्रकांचे वाटप केले आहे. पाच हजार स्टिकर्स, पोस्टर दवाखाने, खासगी रुग्णालयात चिटकविण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार ड्रॉप लेनच्या माध्यमातून होतो. त्यासाठी वेळोवेळी साबनाने व्यवस्थित हात धुवावा. हस्तांदोलन, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हे उपाय केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. खोकला झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आयुक्त काय म्हणाले
– महापालिकेकडून 8888006666 हेल्पलाइन क्रमांक जारी
– सर्व शासकीय कार्यक्रम महापालिकेकडून रद्द
– खासगी कार्यक्रम घेणाऱ्यांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन
– शहरातील 231 जणांनी केली महिन्याभरात परदेशवारी
– वायसीएम, भोसरी, पिंपरीतील जिजामाता हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वार्ड
– प्रत्येकाने मास्क घालण्याची गरज नाही
– तपासणी पथकांच्या माध्यमातून परदेशवारी केलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू
– खबरदार, थुंकल्यास 150 रुपये दंड
करोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या थुंकीद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी बस, रेल्वे स्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 150 रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे.