नारायणगाव – तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारायणगाव व वारूळवाडी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीसाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नारायणगावने आरमाराचा जिवंत देखाव्याने जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांचे लक्ष वेधून चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरले आहे.
या चित्ररथाची नारायणगाव ते शिवनेरी किल्ला पायथा व पुन्हा नारायणगाव अशी रॅली काढण्यात आली होती. तिथीप्रमाणे 12 मार्च रोजी साजऱ्या होत असलेल्या शिवजयंती सोहळ्यातील रॅलीसाठी नारायणगावच्या राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा 13 बाय 25 फुटांचा चित्ररथ तयार केला होता. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनात सादर करण्यासाठी महाराष्ट्राने तयार केलेला चित्ररथ नाकारण्यात आला होता.
त्यामुळे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे यंदा शिवजयंतीसाठी याच धर्तीवर चित्ररथ तयार करायचा आणि शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या जन्मभूमीत रॅलीत सहभागी करायचा, असे ठरवले होते. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ईश्वर पाटे, योगेश शेटे, आकाश कानसकर, पप्पू भूमकर, अनिल दिवेकर, योगेश सोनवणे, किशोर मेहेर, जालिंदर खैरे, दीपक पांचाळ, संतोष भालेराव, नबाब अली, राजेश बाप्ते आदींनी परिश्रम घेतले.