नारायणगाव -जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. 28) आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली आहे. जुन्नर तालुक्यात या आठवड्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात शनिवारी (दि. 27) ओतूर 1, संतवाडी 1, निरगुडे1 असे तीन रुग्ण आढळून आले होते. तर आज (रविवारी) जुन्नर 1, येणेरे जवळील विठ्ठलवाडी-1, वारूळवाडी 1 असे तीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जुन्नर तालुक्यात करोना बाधित रुग्णसंख्या 58वर गेली आहे. त्यामुळे तालुका रेड झोन कडे वाटचाल करीत आहे.
तालुक्यात मुंबई, पुणे येथून येणाऱ्या नागरिकांमुळे करोना प्रादुर्भाव होत होता, असा समाज झाला होता; पण या आठवड्यात स्थानिक नागरिकांना करोनाची बाधा होत असल्याचे आढळल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
30 लोकांची चाचणी
ओतूर -जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असून अधिकाऱ्यांच्या संपर्कातील 30 जणांना लेण्याद्री कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित पोलीस अधिकारी यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील पोलीस कर्मचारी व इतर लोकांना चाचणी करून क्वारंटाइन करण्यात आले आहे.