पिंपळवंडी – पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावकडून आळेफाटा दिशेला भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने मोटारसायकला धडक दिल्यामुळे आई, बाप, मुलगा या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास जांबूतफाटा (14 नं., ता. जुन्नर) या ठिकाणी घडली.
राजेश निवृत्ती लेंडे (वय 40), सुरेखा राजेश लेंडे (वय 35) व यश राजेश लेंडे (वय 15, सर्व रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पिंपळवंडी भटकळवाडी येथील राजेश निवृत्ती लेंडे यांच्या पुतणीचा विवाह दोन दिवसांवर आला होता म्हणून ते त्यांची पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना घेऊन नारायणगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते.
घराकडे परतत असताना 14 नं. जवळील जांबूत फाट्याजवळ असलेल्या एका मॉलजवळ आले असता त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या मोटारीने (एमएच 14 जेएच 2206) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. कारचा चेंदा मेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नारायणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.