पुणे -राज्यशासनाच्या नवीन निकषांनुसार महापालिकेने शहरात सोमवारपासून (दि.14) लागू करण्यात आलेल्या आदेशांत महापालिकेने सुधारणा केली आहे. या नवीन आदेशानुसार, आता अत्यावश्यक सेवांच्या दुकानांव्यक्तिरिक्त शहरात शनिवारी आणि रविवारी सलून, स्पा, मॉल तसेच हॉटेलला आठवड्याचे सातही दिवस परवानगी असल्याचा समज निर्माण झाला होता.
त्यामुळे पालिकेने सुधारित आदेश काढत या अस्थापना इतर व्यावसायिक दुकानांसोबतच शनिवारी आणि रविवारी बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
राज्यशासनाच्या नवीन निकषांनुसार, साप्ताहिक रुग्णसंख्या आणि उपलब्ध बेडच्या अनुषंगाने मोठी शहरे तसेच जिल्ह्यांच्या लॉकडाऊनचे टप्पे ठरवले आहेत. त्यानुसार मागील आठवड्यात पुणे शहर लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात येत असल्याने शहरातील दुकानांना सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली होती, तर अत्यावश्यक सेवांची दुकाने आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार ठेवण्यात येणार आहेत, तर इतर सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने 14 जूनपासून लागू केले.
मात्र, या आदेशात पालिकेने सलून, स्पा, ब्यूटी पार्लर तसेच जीम आठवड्याचे सातही दिवस पूर्वनियोजित वेळ घेऊन सुरू राहतील, असे नमूद केले होते. तसेच मॉलमध्येही अत्यावश्यक सेवांचे साहित्य मिळत असल्याने तेदेखील सुरू राहणार का? बंद राहणार याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने सुधारित आदेश काढत शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या दोन दिवसांत केवळ किराणा, दूध, फळे, भाजीपाला, चिकन, बेकरी, मिठाई हीच दुकाने सुरू राहणार आहेत, तर सुधारित आदेशात मॉलही बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हेदेखील वीकेंडला बंदच राहणार असून, त्या ठिकाणी केवळ पार्सल सेवा तसेच घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत देता येणार आहे.