वाई – वाईच्या पश्चिम भागातील अतिशय दुर्गम व जंगली भागातील जोर गावात डोंगर परिसरात वाई वनविभागाने स्पॅगनम मॉसची (शेवाळ्याचा एक प्रकार) तस्करी करताना महाबळेश्वर तालुक्यातील तीन जणांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडील 29 पोती शेवाळ्याची अंदाजे बाजारभाव किंमत चार लाख 50 हजार रुपये इतकी आहे. ही ही धाडसी कारवाई रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्याचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे व त्यांच्या टीमने केली.
वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दि. 19 रोजी रात्री बाराच्या सुमारास जोर येथील जंगल परिसरात शेवाळ्याच्या मालाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या संपूर्ण टीमने रात्री एकच्या सुमारास त्या ठिकाणी कारवाई केली.
महाबळेश्वर तालुक्यातील महारोळे (पो.तळदेव) येथील बशीर कादर शारवान (वय 68), नासीर उस्मान शारवान (वय48), आशपाक इस्माईल शारवान (वय- 44) या एकाच घरातील तीन संशयितांकडे 29 पोत्यांत शेवाळे भरलेले आढळले. मालाने भरलेली महिंद्रा कंपनीची पिक-अप (एमएच 11 एजी 2094) जप्त करण्यात आली आहे. याची अंदाजे किंमत चार लाख पन्नास हजार एवढी आहे.
एवढे मोठ्या प्रमाणात स्पॅगनम मॉस( शेवाळे) कोणासाठी खरेदी करण्यात येत आहे, याचा तपास वन विभागाकडून करण्यात येणार असून मुख्य संशयितांवरसुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. मालासह संशयितांना अटक करण्यात आल्याने वाई तालुक्यातील अशा प्रकारची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून यामध्ये मोठी टोळी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपवनरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वनरक्षक व्ही. बी. भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वनपाल रत्नकांत शिंदे, सुरेश पटकारे, अजित पाटील, वनरक्षक संदीप पवार, प्रदीप जोशी यांनी कारवाईत सहभाग घेतला.