शेवगाव -तालुक्यातील ढोरजळगाव येथे आढळलेल्या करोनाबाधिताच्या घरचे पाचजण व त्याने शेवगावात उपचार घेतलेल्या रूग्णालयातील तिघे अशा आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनासह नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
चाकण येथील एमआयडीसीमध्ये कामासाठी गेलेला ढोरजळगावचा 32 वर्षीय युवक करोनाबाधित असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला होता. तालुक्यात आढळलेला हा पहिला रुग्ण असल्याने आता आणखी किती बाधित निघतात या शंकेने तालुका धास्तावला होता.
या रुग्णाचे आई-वडील, आजी, पत्नी, भाऊ, चुलते व चुलतभाऊ अशा सात जणांना प्रशासनाने ताब्यात घेऊन नगरच्या सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यातील दोन जणांना प्राथमिक तपासणीतच बाजूला काढून त्यांचे स्राव घेतले नव्हते. तर शेवगावला औषधोपचार केलेले डॉक्टर, एक्स-रे टेक्निशियन व सिस्टर हे तिघे स्वतःहून नगरला तपासणीसाठी गेले होते. या सर्वांचे अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आले.
तहसीलदार अर्चना भाकड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेवगावातील संबंधित रुग्णालयातील पेशंट व कर्मचारी मिळून 48 जणांना त्याच रुग्णालयात क्वॉरंटाईन केले आहे. तसेच या बाधित रुग्णाची वस्ती ढोरजळगाव आव्हाने या दरम्यान असल्याने या दोन्ही गावालगत दोन किलोमीटर बॉर्डर कंन्टेनमेंट झोन लागू करण्यात आला आहे. या झोनमधील 197 घरे व त्यातील 1077 व्यक्तींची तपासणी आज करण्यात आली. प्रतिबंधीत क्षेत्रात येणाऱ्या ढोरजळगाव व आव्हाणे हद्दीतील आपेगाव, मलकापूर, गरडवाडी, दिंडेवाडी येथील प्रत्येक व्यक्तींचीही घरोघर जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे.
सहा पथके त्यासाठी सध्या कार्यरत आहेत. आव्हाणेला सरपंच संगिता कोळगे व ढोरजळगावला सरपंच रागीणी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली करोना ग्रामसंरक्षक समितीची बैठक घेऊन जनजागृती व जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत आज बाहेरून आलेल्या सहा व्यक्तींना आपेगाव, गरडवाडी व ढोरजळगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ढोरजळगाव केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल बडे यांच्यासह डॉ. ज्ञानेश्वर बडे, जे.बी.कुलकर्णी, ए.जी.गायकवाड, उषा शिंदे, सी.व्ही.अरोळे, डी.टी पालवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.