बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61%
पुणे – शहरातील एकूण करोना बाधितांच्या तुलनेत प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 39 टक्के, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61 टक्के आहे. पंधरा दिवसांपूर्वी ऍक्टिव्ह केसेसचे प्रमाण सुमारे 45 टक्के होते. त्यामुळे मागील पंधरवड्यात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “मेच्या सुरूवातीपासून करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या साथीला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या तिपटीने वाढवली आहे. परिणामी करोनाची बाधा झालेले मात्र, कोणतीही लक्षणे नसलेले अनेक रुग्ण सापडत असून त्यांच्यामुळे भविष्यात होणारा करोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यात यश येत आहे.
तर सुमारे 65 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तसेच वेळीच निदान झाल्याने हे रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा चांगलाच वाढला असून, ऍक्टिव्ह केसेसची प्रकरणे 65 वरून मेअखेरीस 39 टक्के झाली आहेत.’