मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच वादात अडकली आहे. तिच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. मात्र आता कंगनाला पाठिंबा देण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. त्यात रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा देखील समावेश आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून कंगना राणावतला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या भाजप आणि रिपाइं पक्षावर टीका केली आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख ?
लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱयांनी ठेवलेच पाहिजे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे!
मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्र्ाहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्र्ाहरण सुरू असताना घडलेले दिसत होते. शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच. मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान! डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण
महाराष्ट्रद्वेष्टय़ा मंडळींबरोबर
खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जसे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांसारखे शूर होते तसे काही अस्तनीतील निखारेही होतेच. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळायची राहिली काय?