देहूरोड शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी
देहूरोड – देहूरोड मुख्य बाजार पेठेतील व्यापाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीमुळे काही समाजकंटक पोलिसांकडे खोट्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे खोट्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी देहूरोड शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, नगरसेवक विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, अँथोनी स्वामी, शिवसेनेचे शहर प्रमुख भरत नायडू, तालुका संघटक रमेश जाधव, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, अमोल नाईकनवरे, सूर्यकांत सुर्वे, सर्वपक्षीय अध्यक्ष लहूमामा शेलार, व्यापारी संघटनेचे मदन सोनिगरा, महावीर बरलोटा, नीरज गुंदेचा, रिपाईचे (आठवले गट) शहराध्यक्ष सुनील गायकवाड, इंद्रपालसिंग रत्तू आदीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेत त्यांना निवेदन दिले.
देहूरोड परिसरात काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून बाजार पेठेतील बांधकामांबाबत बोर्ड प्रशासनाकडे तक्रारी करुन पैसे उकळण्याचे काम करीत आहेत,अशा पैशांची मागणी करणाऱ्या एका समाजकंटकांविरोधात व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणात संबधितावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर संबंधिताने व्यापाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच खोट्या तक्रारींवर कारवाई झाल्यास पैसे उकळणाऱ्यांचे धाडस वाढेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहानिशा केली जाईल – आयुक्तांनी दिला विश्वास
कोणावरही अन्याय होणार नाही, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. खोटे गुन्हे दाखल होणार नाही, असे आश्वासन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.