बारामती – राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट (Sharad Pawar) व अजित पवार गटाचा (Ajit Pawar) संघर्ष बारामती (Baramati) येथे शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. गेले ५० वर्ष शरद पवारांच्या बाजूने उभे असलेल्या व्यापाऱ्यांनी शरद पवारांच्या मेळाव्याला चक्क नकार दिला आहे. वेळ नसल्याचे कारण पुढे करत शरद पवार यांच्या मेळाव्याला उपस्थितीत राहू शकत नसल्याचे व्यापारी संघाच्या वतीने शरद पवारांना कळविण्यात आले आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक मेळावे घेत आहेत. शहरातील व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्याचे त्यांनी ठरवले. मात्र या मेळाव्यास वेळ नसल्याचे शरद पवार यांना सांगितले. त्यामुळे बारामतीतील व्यापारी अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे उघड झाले.
बारामतीतील एका कार्यक्रमात चक्क शरद पवार (Sharad Pawar) यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. पवार म्हणाले, माझ्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकीर्दत असे कधी घडले नाही. व्यापाऱ्यांनी मेळावा घेण्यास कधीही नकार दिला नाही. आता मात्र मेळाव्यास व्यापारी नकार देत आहेत, असे पवार यावेळी म्हणाले. मात्र याबाबत दोन-तीन दिवसात भूमिका स्पष्ट करू, अशी व्यापाऱ्यांची चर्चा सुरू आहे. यापूर्वी अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यास व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.