मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता देखील शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायला तयार आहे अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर सध्या राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबद्दल बोलत असताना शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना,“मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असे म्हटले होते. त्याच्या या प्रतिक्रियेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.
संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंवरील अप्रत्यक्षपाने केलेल्या टीकेला शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर देत, संजय राऊतांना कदाचित घरात बसून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचं असेल. म्हणून ते त्यांच्या अनुभवातून बोलले असतील. असं बोलून गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री गेल्या ७५ वर्षात कधीही झाला नाही आणि होणारही नाही. असे म्हणत संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.
दरम्यान, अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबद्दल गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवारांमध्ये आहे. परंतु १४५ चा आकडा (१४५ आमदार) आणणार कुठून? भविष्यात असा काही आकडा त्यांच्याकडे जमा होईल असे काही वाटत नाही. असे यावेळी गायकवाड यांनी म्हटले.