T20 World Cup 2024 : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला अनुभवी कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हा संघ निवडला आहे. खेळाडू म्हणून विल्यमसनचा हा सहावा T20 विश्वचषक आहे, तर कर्णधार म्हणून तो चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. टी20 विश्वचषकासाठी कर्णधार बनवलेला केन विल्यमसन सध्या आयपीएल 2024 साठी भारतात आहे. विल्यमसन गुजरात टायटन्सचा भाग आहे.
विल्यमसनशिवाय संघाच्या गोलंदाजी विभागात अनुभवी टिम साऊदीचाही समावेश आहे. जो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या संघात मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र हे दोन चेहरे आहेत, जे पहिल्यांदाच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत.
आयसीसीने संघ जाहीर करण्यासाठी 1 मे ही अंतिम मुदत ठेवली आहे. मात्र न्यूझीलंडने त्याआधी 29 एप्रिलला (सोमवार) संघाची घोषणा केली. T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर 1 जूनपासून ही स्पर्धा अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. टी20 विश्वचषक 1 जूनपासून सुरू होणार आहे, परंतु न्यूझीलंड 7 जूनपासून मोहीम सुरू करेल. या स्पर्धेत न्यूझीलंड संघाला 7 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध , त्यानंतर 12 जून रोजी यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध खेळावे लागेल. 14 जून रोजी किवी संघ युगांडा विरुद्ध तर 17 जून रोजी किवी संघ पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळेल. न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वचषकात ‘क’ गटात आहे.
अनुभवी आणि युवा खेळाडूंमध्ये समतोल…
विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल असल्याचे दिसून येत आहे. संघात केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, टिम साऊथी आणि डॅरिल मिशेलसारखे अनुभवी खेळाडू आहेत. याशिवाय मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र या युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. रचिन रवींद्र 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा देखील भाग होता. रचिन सध्या आयपीएल 2024 साठी भारतात आहे. तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
Our squad for the @t20worldcup in the West Indies and USA in June 🏏
MORE | https://t.co/a8cLkEjSDH #T20WorldCup pic.twitter.com/OUwHjEdaPn
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 29, 2024
वेगवान गोलंदाज टीम साऊदीला साथ देण्यासाठी ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, जिमी नीशम आणि मॅट हेन्री यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर केन विल्यमसन व्यतिरिक्त डेव्हॉन कॉन्वे, फिन ऍलन, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र या खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
डेव्हन कॉनवे सध्या अंगठ्याच्या दुखापतीतून बरा होत आहे. तो भारतात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मध्ये खेळू शकलेला नाही. त्याची दुखापत बरी होऊ शकली नाही पण आता जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे.
या संघात वेगवान गोलंदाज ॲडम मिल्नेवरही नजर होती पण तो घोट्याच्या दुखापतीतून सावरू शकला नाही आणि त्यामुळे त्यालाही या संघात स्थान मिळू शकले नाही. याशिवाय, काइल जेमिसन हाही पाठीच्या खालच्या बाजूच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बरा होत असून त्यालाही या संघात स्थान मिळू शकलेले नाही.
T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ खालीलप्रमाणे…
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी. (प्रवासी राखीव खेळाडू – बेन सियर्स)