मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आज ते पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
खोपोलीतील शिवप्रबोधन यात्रेनंतर बोलताना सुषमा अंधारेंनी,“अमित शाहांनी दिल्ली ते मुंबई येणं-जाणं करण्यापेक्षा एकादाचा मुंबईत दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा. एका रुममध्ये त्यांनी राहावं आणि दुसऱ्या रुममध्ये पंतप्रधान मोदांनी राहावं. सारखं सारखं अपडाऊन करू नये. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतक्या फेऱ्या मारण्याची गरज नाही”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.
पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. कर्नाटकमधील रॅलीत बोलताना काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या, असे विधान पंतप्रधान मोदी यांना केले होते. यासंदर्भात बोलताना, “शिव्या देणं ही भाजपाची संस्कृती आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसला शिव्या देण्यातच गेलं. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे ते असंच बोलत राहतील”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला होता. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर देत,”राणेंची दोन्ही मुलं विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलू नये, असे म्हटले.