आयुक्तांचे स्पष्टीकरण : शहरातील काही भागांमध्ये मात्र ठराविक वेळेतच दुकाने उघडी
पिंपरी -“करोना’चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु शहरात काही प्रमुख भागांमध्ये ठराविक वेळेतच दुकाने उघडी ठेवण्यास सांगून अन्य वेळेत सरसकट दुकाने बंद करायला लावली जात आहेत. अशा प्रकारे दुकानदार आणि नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.
शहरात सील केलेल्या भागामध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सील केलेल्या भागांशिवाय अन्यत्र किराणा दुकाने किंवा दुध विक्री बंद ठेवण्याबाबत त्यांच्या कोणत्याही सूचना नाही. तरीही, शहरातील काही प्रमुख भागांमध्ये किराणा दुकाने, दूध डेअरी ही ठराविक वेळेतच सुरू ठेवण्यात येत आहे.
शहरातील भाजी आणि फळ विक्री तीन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एकीकडे फळ आणि भाजी विक्री बंद असताना किराणा साहित्य आणि दुधासाठी देखील नागरिकांवर आज काही भागांमध्ये वणवण भटकण्याची वेळ आली. करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भाग “सील’ केले आहेत. त्यामध्ये दापोडी आणि कासारवाडीचा काही भाग, भोसरीतील काही भाग, खराळवाडी, दिघी, चिखलीतील स्वस्त घरकुल प्रकल्पाचा भाग, थेरगाव-पडवळनगर आदी भाग सद्य:स्थितीत “सील’ केलेले आहेत.
लाकडी बांबूंनी अडविले रस्ते
शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी स्वत:च लाकडी बांबू टाकून रस्ते अडवून ठेवले आहेत. सील केलेल्या भागांमध्ये प्रवेश बंदी आहे. तथापि, संबंधित भाग वगळता अन्य भागातही नागरिकांनी अन्य भागातील लोकांनी आपल्या भागात येऊ नये. तसेच, आपल्या भागातील नागरिकांनीही बाहेर पडू नये, यासाठी रस्ते अडविले आहेत. त्याचा फटका अत्यावश्यक सेवेलाही बसू लागला आहे.
शहरातील सील केलेल्या भागांमध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याबाबत सांगितलेले आहे. अन्य भागांमध्ये मात्र दूध विक्री किंवा किराणा दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना केलेल्या नाहीत.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त.