कात्रज घाटात टेम्पो पकडला : 12 बॉक्स जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुणे – अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स चोरून शहरात आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नाकाबंदी करणाऱ्या भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना पकडून 12 बॉक्स जप्त केले.
सलीम बशीर शेख (24) आणि सिद्धार्थ संजय मिसाळ (25, दोघे रा. भिलारेवाडी) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत दारू तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र पारखी, सत्यप्रेम तोंडे, बापू भिंगारे, पोलीस शिपाई तुकाराम झुंजार हे कर्मचारी सोमवारी रात्री कात्रज घाट येथे नाकाबंदीसाठी उभे होते. यावेळी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरवळकडून पुण्याच्या दिशेने जाणारा दुधाचा टेम्पो त्यांनी थांबविला.
तसेच टेम्पो तपासताना चालकाच्या बोलण्यावर संशय वाटल्याने टेम्पो व्यवस्थित तपासला असता दुधाच्या क्रेटमागे बिअरचे 12 बॉक्स लपवून ते पुणे शहरात घेऊन जात असताना दिसून आले. या बीअरच्या बाटल्यांची किंमत सुमारे 29 हजार रुपये आहे. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसानी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले. पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह टेम्पो तसेच चालक आणि त्याचा साथीदार यांना भारती पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दोनशेच्या बाटलीची सहाशे रुपयांना विक्री
संचारबंदीदरम्यान पोलिसानी अडवू नये, यासाठी आरोपींची टेम्पोच्या समोरील काचेवर अत्यावश्यक सेवा असे स्टिकर लावले होते. मात्र, कात्रज घाट येथून येताना मध्यरात्री नाकाबंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. चेक करताना बीअरचे बॉक्स मिळून आले. बिअरची एक बाटली शिरवळ भागातून 200 रुपयांना विकत घेत ती पुुण्यात आणून 600 रुपयांना विक्री करणार होते, अशी माहिती तपासातून उघडकीस आली आहे.