मुंबई – सध्या नवा करोना विषाणू सर्वत्र थैमान घालतो आहे. भारतातही हा विषाणू वेगाने पसरतो आहे. अशातच सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. मात्र, करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव (नसो फैरिंजीयल स्वाब) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या ३ ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.
#CoronaVirusUpdate
कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्यामुळे #कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा; आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा#FactCheck pic.twitter.com/cmRf3OCMMv— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 18, 2020
त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सोशल मीडिया ठरतोय घातक
“करोना’बाबत सोशल मीडियामुळे जास्त दहशत पसरत आहे. अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात. “करोना’ नेमका कशामुळे होतो त्याची कारणे काय याबाबत चुकीची माहिती पसरविली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “करोना’च्या रुग्णाबाबतची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे अमुक परिसरात “करोना’चा आढळला अशी माहितीही निव्वळ अफवा असते.