बंदीचे आदेश झुगारणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई होणार
लोणावळा – जागतिक आपत्ती म्हणून जाहीर झालेल्या करोना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसरीकडे शासनाने लागू केलेली बंदी झुगारून ज्या हॉटेल्स किंवा रिसॉर्टमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील, त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशा स्पष्ट लेखी सूचना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने लोणावळा शहरातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट चालकांना देण्यात आल्या आहेत.
करोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी लोकांचा समूह एकत्र येण्याची शक्यता असते, अशा सर्व ठिकाणी 31 मार्चपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील शहरातील काही हॉटेल्समध्ये कॉन्फरन्स किंवा अन्य छोटे-मोठे समारंभ आयोजित होत आहे. आणि हे सर्वांसाठी घातक असल्याने असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांवर तसेच हॉटेल चालकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याधिकारी सचिन पवार यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
करोनापासून बचावासाठी एकमेकांचा थेट स्पर्श टाळा – डॉ. अमोल अगरवाल
करोना या रोगाचे विषाणू तुलनेत जड असल्याने हवेमधून त्यांचा फैलाव होण्याची शक्यता ही कमी असते. मात्र एकमेकांसोबत हस्तांदोलन करणे यासारख्या थेट शारीरीक स्पर्शाने या विषाणूचा फैलाव अधिक प्रभावीपणे होतो. तसेच करोना रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंकमधून हे विषाणू थेट आपल्या शरीरावर आले किंवा एखाद्या वस्तूवर पडले आणि ठराविक काळात त्या वस्तूला आपला स्पर्श झाला, तरच त्याचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी असे थेट संपर्क टाळावे आणि योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला लोणावळा शहरातील प्रसिद्ध रोगतज्ज्ञ डॉ. अमोल अगरवाल यांनी दिला आहे.