अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली
नागपूर- ईडी, सीबीआय चौकशीची भीती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच आरोप तर सगळ्यांवरच होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहायता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने आठवड्यात छापे टाकले आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले, आम्ही वारंवार यांच्यावर ईडी लावा, सीबीआय लावा असे म्हणत नाही. हे सत्तेत होते, तेव्हा यांच्यावर आरोप लागायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: विधानसभेत सांगायचे की हे निर्दोष आहेत. त्यावेळी कुठे गेली होती ईडी? तेव्हा कुठे गेले होते सीबीआय? पण आता मुद्दाम ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे.
राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजप ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तसेच लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.
अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपास यंत्रणांचा भाजप दुरुपयोग करत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.